|| जय जय रघुवीर समर्थ
उपासनेला दृढ चालवावे
गुरूदेव संताशी सदा नमावे
सर्वामुखी मंगल बोलवावे ||
या सूचनेप्रमाणे श्री समर्थ विद्यालयाच्या संस्थापकांसारख्या महापुरूषानी एकदिलाने, उदात्त हेतूने समर्थ शाळेचे इवलेसे रोपटे स्वातंत्र्यपूर्व काळात अमरावतीच्या मातीत लावले आणि या महामानवांच्या परीसस्पर्शाने त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.
अशा समर्थ शाळेचे विद्यार्थी ज्ञानाची शिदोरी घेऊन विविध क्षेत्रात चमकले. समर्थांचा वरदहस्त आणि समर्थ परिसरातील मातीचा गुण असा आहे की, जे जे या मातीच्या संपर्कात येतात त्यांच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहत नाही.
अशा या समर्थ विद्यालयाची सुरूवात झाली ती १६ जुलै १९३४ साली मुधोळकरपेठ मधील कै. भालचंद्ग जयराम काणे यांच्या घरातून शिक्षणाची आवड, आणि काही तरी चांगले करण्याची जीद्द या विचारसरणीतून काही व्यक्ती एकत्र आल्या, यात सर्वश्री कृष्णराव पांडे, एल. डब्ल्यु पांडे, पारनेरकर, व. ना. गोडबोले, चुटके यांचे योगदान मोलाचे ठरले.
पुढे ४ महिन्यानंतर श्री. कृष्णराव पांडे यांनी श्री. काणे यांच्या घरी भरणार्या शाळेसाठी जनार्दन पेठेमधील (चुनाभट्टी) त्यांची शेताची जागा दिली. सुरवातीला साधी ताट्यांची शाळा होती. आजचे शाळेचे नाव श्री समर्थ विद्यालय ठेवावे असे श्री व. ना. गोडबोले सरांनी सूचवले आणि सर्वांनी ते एकमताने मान्य केले. त्या काळी शाळेची फी चार आणे होती. प्रथम शाळेत ८ वी ते १० वी चे वर्ग सुरू झाले. विद्यार्थी फक्त १५-२० होते. न्यू हायस्कुल मेनची १०० रू. पगाराची नोकरी सोडूून स्वतःच्या शाळेत ५० रू. पगार उचलणार्या काणे सरांनी विद्यार्थी सुध्दा जमा केले. पण काही दिवसात हे चित्र पालटले. मन लावून काम करणारा शिक्षक वृंद शाळेला लाभला आणि विद्यार्थ्यांचा ओघ समर्थ शाळेकडे वाढू लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात इ. ५ वी ते ११ वी पर्यंतचे वर्ग येथे भरत. पुढे १९४७ नंतर ताट्यांची शाळेची पक्की इमारत बांधावयास घेतली. पूर्ण इमारत कृष्णराव पांडे यांनी भाडयातून वळती करून घेतली. कोणत्याही राजकीय वरदहस्ताशिवाय अनेक दिग्गज ऋषीतुल्य व्यक्ती एकत्र आल्या जीवनातील चांगल्या संधी सोडून शिक्षकी पेशा स्विकारला. संस्थेचे चालक समतावादी विचारसरणीचे, विद्यार्थी ज्ञानपिपासू तर शिक्षक ध्येयवादी होते त्यामुळेच सर्वश्री बी. जे. काणे, कृष्णराव पांडे, श्री. काकासाहेब गोखले, वि. दा. ब्रम्ह, श्री. बाळासाहेब हिरूळकर, एन. टी. राजदेरकर, यांच्यासारख्या शिल्पकारांनी घडविलेल्या शाळेच्या इमारतीचा कळस आजच्या यामध्ये सर्वश्री डॉ. प्र. ना. वडोदकर, वि. ल. देऊᅠसकर, डॉ. वि. के. कोलवाडकर, प्रा. पुरोहित व डॉ. बोधनकर यासारख्या संस्था पदाधिकार्यांनी उंच चढवून पूर्णत्वास नेला.
सुरूवातीला श्री समर्थ शाळा काणे सरांची समर्थ शाळा म्हटली जाई, इ. स. १९६० नंतर १९६३-६४ दरम्यान श्री. राजदेरकरांच्या कारकीदीर्र्ᅠत शाळेसाठी प्लॉटचे प्रयोजन श्री. एल. डब्ल्यु. पांडे सरांनी केले. २५ पैसे स्क्वेअर फुटाने देवरणकरांचा ३ एकर प्लॉट खरेदी करण्यात आला. (सध्याची समर्थ विद्यालयाची इमारत याच ठिकाणी उभी आहे.) प्लॉट खरेदी करण्यास श्री. कृष्णराव पांडे आणि आजचे संस्थाअध्यक्ष डॉ. कोलवाडकर सरांचे वडील कै. डॉ. केशवराव कोलवाडकर या दोघांनी एक-रकमी पैसे ८०,००० दिले. त्यावेळी श्री. आप्पासाहेब ब्रम्ह अध्यक्ष होते. इमारत बांधतांना आर्थिक उसनवारीचा आधार श्री. जवाहरलालजी मुणोत करीत. श्री. मुणोत यांनी त्यावेळी व्यापारी वर्गाकडून इमारतनिधी म्हणून मोठया रकमा मिळवून दिल्या. श्री. मुणोत यांच्याच हस्ते इमारतीचे भूमिपूजन झाले. इमारत बांधण्यासाठी शाळा चॅरिटी शो करीत असे. नवीन शाळेच्या तळमजल्याचे पूर्ण बांधकाम श्री. कोपरकर सरांच्या देखरेखीखाली झाले. सन. १९६५ ची गुढी पाडव्याची पूजा करून इ. ८ वी च्या ४ तुकडया नवीन इमारतीत आल्या. इ. स. १९९१-९२ ला पांडे परिवाराने श्री समर्थ शाळेची जुनी इमारत असलेली जागा विकून स्वतः ४ भावंडे व पाचवे भावंड शाळेला धरून पाचवा हिस्सा शाळेला दिला. त्याच पैशातून वरचा मजला बांधून समर्थ शाळा पूर्णपणे नवीन इमारतीत आली. मा. कोपरकर सर, वडोदकर सर व तत्कालीन संस्थाचालक यांच्या योगदानातून श्री समर्थ शाळा येथेही नावारूपास आली. वास्तू बदलली पण ध्येय, विचार तेच होते. अशा वरद वास्तूस मुख्याध्यापकही तोलामोलाचेच लाभले. श्री समर्थ विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक श्री. बी. जे. काणे त्यानंतर श्री. नि. त्र्यं. राजदेरकर सर ज्यांचा काळ श्री समर्थ विद्यालयाच्या इतितहासात सुवर्ण काळ म्हटला जातो. यांनी शाळा खर्या अर्थाने नावारुपाला आणली. त्यानंतर श्री. पी. बी. गुल्हाने पुढे श्री. ग. ना. लेले पूढे बी. जे. जोशी, श्री. म. श. निपाणकर, सा. सी. गुढे, पुढे श. रा. बाभुळकर यांच्या काळात श्री समर्थ विद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम राखली. त्यानंतर श्री. जाजू सर, श्री. नेरकर सर, श्री. शेंडे सर, श्री. मुळे सर, श्रीमती धर्माधिकारी (पहिल्या महिला मुख्याध्यापिका) मॅडम यासारखे मुख्याध्यापक शाळेस लाभले आणि विद्यमान मुख्याध्यापिका सौ. मंगरूळकर मॅडम यांच्या या योगदानातून श्री समर्थ माध्य. आणि उच्च माध्य. विद्यालयाचा डोलारा मोठया दिमाखात उभा आहे.
हा डोलारा समर्थपणे पेलण्यासाठी आदर्श शिक्षक आणि त्यांची तळमळ यांचे योगदान मोलाचे ठरते. पहिल्या १० वर्षात सर्वश्री राजवाडे सर, बाबुराव कुर्हेकर सर, राजाभाऊ कुर्हेकर सर, राजदेरकर सर, सबनीस सर, गुल्हाने सर, लेले सर, नाना मुळे सर, बी. जे. जोशी सर, एल. डब्ल्यु. पांडे सर, त्रिकांडे सर, काशीकर सर, दिक्षित सर, उपाध्ये सर, राठोड सर हे ध्येयवेडे कार्यकर्ते शिक्षक शाळेला मिळाले. पेन्शन आणि इतर सेवा लाभांची पर्वा न करता शिक्षण व विद्यार्थ्याप्रतीची तळमळ हीच शिदोरी ते मानीत त्याच बळावर श्री समर्थ विद्यालय समर्थ बनले.
मोर्चा किंंवा संप असला तरी काणे सरांची समर्थ शाळा मात्र भरे. समर्थ शाळा सुरवातीला काणे गुरूजींची शाळा म्हटली जाई. यानंतर मात्र त्या काळी ही शाळा राजदेरकर गुरूजींची म्हणून ओळखली जाई. शाळेच्या नावाने शिक्षक ओळखण्यापेक्षा शिक्षकांच्या नावाने शाळा ओळखली जाणे यासारखे शिक्षकाचे दुसरे परमभाग्य नाही.
आदरणीय राजदेरकर सर वैयक्तिक स्वार्थरहित व आदर्श व्यक्तिमत्व होते. १९४० साली श्री. एल. डब्ल्यु. पांडे सर लागले ते स्काउटर व व्यायाम पटूᅠहोते. त्याकाळी श्री समर्थ विद्यालयाचा जिल्हा क्रीडा स्पर्धेत हिरीरीने सहभाग असे. मुलींचा विभाग श्रीमती पावगी मॅडम सांभाळत. पावगी मॅडम शाळेतील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. पुढे शाळेत मुलींची संख्या वाढली त्यानंतर शाळेत मुळे मॅडम, निपाणकर मॅडम लागल्या. त्या काळात गोडबोले सरांनी विद्यार्थ्यांचा सायन्स क्लब स्थापन केला होता. सायन्स क्लब चे विद्यार्थी चंद्रपुरच्या खाणीस भेट देण्यासाठी गेल्याचा वृत्तांत आजही श्री. गोडबोले सर सांगतात.
ऋषितुल्य लेले गुरूजींचे तन्मयतेने शिकविणे विद्यार्थ्यांच्या कानातून थेट मनात झिरपत असे. श्री. लेले सरांच्या संस्कृत विषयाची किती र् ऐकून विद्यार्थी केवळ त्यांच्या विषयाकरिता श्री समर्थ शाळेत येत. त्यातील एक विद्यार्थी म्हणजे उदय पराडकर जे ११ वीत मेरीट आले. त्यावेळी श्री. लेले सर, कोपरकर सर कायम विद्यार्थ्यांनी घेरलेले असत. विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारल्याबरोबर लगेच सोडविण्यास ते तत्पर असत. शाळेत कुर्हेकर बंधू नोकरीस होते. गजानन कुर्हेकर सर आजही समर्थ शाळेच्या यशस्वी वाटचालीवर विश्वास ठेवतात. श्री. कोपरकर गुरूजी तर जणू शाळेचे हृदयच ते संस्कृत, इंग्रजी, गणित, विज्ञान सर्वच विषयांचे ते तज्ञ होते. असे गुरूजी पुन्हा होणे नाही.
विद्यार्थ्यांची पुस्तके, कपडे इतर साहित्य सर्वच मदत बहूधा शिक्षकांच्या खिशातून होई. ही वृत्ती शाळेच्या शिक्षकांमध्ये आजही दिसते. एवढेच नव्हे तर ही परंपरा जोपासत आज शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका मा. सौ. मंगरूळकर मॅडम यांनी यासाठी पूअर बॉईज फं ड हा उपक्रम सुरू केलेला आहे. आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ आपणास काही दानराशी द्यावयाची असल्यास या खात्यात देता येते यातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळतो. तसेच हेल्थ केअर हा उपक्रम सुध्दा सुरु केला आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.
श्री समर्थ शाळेच्या एकूण ७५ वर्षाच्या इतिहासात गौरवाची बाब म्हणजे सत्र १९६७-६८ चा महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रथम श्री. नि. त्र्यं. राजदेरकर सरांना मिळाला तर दुसर्यांदा आदर्श शिक्षक पुरस्कार १९९३-९४ ला सौ. सुनीता शहाकार यांना मिळाला. आणि तिसर्यांदा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार ही परंपरा जोपासत श्रीमती गायकवाड मॅडम यांना मिळाला. श्री समर्थ परिवारास यांचा सार्थ अभिमान आहे.
श्री. नाना मुळे यांची गणित शिकविण्याची पध्दत फारच जबरदस्त होती. विशेष उल्लेखनीय म्हणजे श्री. नाना मुळे सरांनी लिहीलेली अभिनव रसायनशास्त्र आणि अभिनव विज्ञान ही पुस्तके त्यावेळी बोर्डाने क्रमिक पुस्तके म्हणून लागू केली होती. ही बाब समर्थ शाळेकरीता खचितच अभिमानाची आहे.
बौध्दिक विकासाबरोबर त्या काळी सर्वांगीण विकासाचे उपक्रमही राबविल्या जात. श्री. शिरभाते सर एन. सी. सी., राठोड सर स्काउटींग, तर पावगी मॅडम गाईडींग शिक वित असत त्यांच्यानंतर शहाकार मॅडम यांनी ही जबाबदारी पेलली. गाईडचे राज्य पुरस्कार कु. सेजल देशमुख हया विद्यार्थिनीस तर राष्ट्रपती पुरस्कार गेल्या वर्षी वैभव फरांदे (स्काऊ ट) यास मिळाला. तर १९९३-९४ चा आदर्श गाईड कॅप्टन पुरस्कार श्रीमती शहाकार मॅडम यांना मिळाला.
सुटया हया हक्काच्या आहेत त्या उपभोगण्यास पाहीजे असे नव्हते. शिक्षकांच्या सुटया कित्येकदा वाया जात. कर्मचारी शिक्षक रविवारी सुट्टीच्या दिवशीही शाळेत येत. सर्वच ध्येयवेडेᅠ होते. अशा ध्येयवेडया शिक्षकांनी जोपासलेली ही शाळा. १९७० साली त्यावेळच्या शिक्षणाधिकांर्यांनी सरकारी शाळांमधील इतर तालुकांच्या ४० शिक्षकांना समर्थ शाळा आदर्श शाळा म्हणून दाखविण्यास आणले होते.
शाळेच्या सुरवातीच्या काळात सहली फारशा जात नसत पण पहिल्या महिला शिक्षिका सौ. पावगी मॅडम यांनी पहिली सहल माहूरला नेली नंतर चंद्रपूरची खाण सहल त्यानंतर मात्र आजपर्यंत अनेक सहली गेल्या. श्री. जाजू मुख्याध्यापक असतांना श्री समर्थ विद्यालयाच्या इतिहासातील पहिली रेल्वेची सहल काढण्यात आली त्यानंतर आजपर्यंत उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भारतात अनेक सहली यशस्वीपणे काढण्यात आल्या. शाळेच्या अमृतमहात्सवी वर्षात शाळेची सहल सज्जन गडावर काढण्यात आली.
शाळेमध्ये सुरूवातीला मुख्य लिपिक म्हणून श्री. कल्याणकर कार्यालयीन कामकाज बघत. मदतीला श्री. सबनीस होते त्यानंतर श्री. हरीभाऊ चांदले जेष्ठ लिपिक म्हणून काम पाहत. त्यानंतर १९७५ पासून श्री. गो. ह. चांदले यांनी श्री. परांजपे यांचे सोबत कार्यालयाची धुरा सांभाळली. कार्यालयीन कामकाजात त्यांच्यासारखी जाणकार व्यक्ती अमरावतीत तरी नाही. जुन्या शाळेतील चपराशी रामप्रसाद आजही सर्वांच्या आठवणीत आहे.
श्री समर्थ शाळा अमरावतीतील नामवंत शाळा होती आणि आजही आहे. समर्थच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा आजही कायम राखली आहे. मा. देऊ सकर सरांच्या कालावधीत इयत्ता ५ वी ची प्रवेशपूर्व चाचणी देऊ न प्रवेश देण्यात आले. अत्यंत पारदर्शी असलेल्या या चाचणी परीक्षेद्वारे निवडलेले अनेक विद्यार्थी पुढे गुणवत्ता यादीत झळकले हे सांगणे न लगे. आज श्री समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी नव्या युगातील आव्हाने पेलण्यास समर्थ आहेत. सत्र १९९९-२००० मध्ये शाळेने पासस्टी साजरी केली. याच सत्रामध्ये शाळेत संगणक विभागाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर इयत्ता ११ व १२ वी ला सुध्दा संगणक हा विषय शिकविण्यास सुरुवात झाली. श्री. समर्थ शाळेच्या इतिहासात आजपर्यंत प्रत्येकवेळी विषय तज्ञ पारखून शिक्षकांची नेमणूक केली जात होती. ती परंपरा आजही कायम आहे.
अशाप्रकारे गुणवत्ता यादीत येणार्या विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा कायम राखणार्या श्री समर्थ शाळेने २००८ साली अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले. करवीरपीठाधीश प. पू. जगद्गुरू श्रीमद्शंकराचार्य श्री विद्यानृसिंंह भारती यांचे शुभहस्ते आणि ख्यातनाम साहित्यिक रामभाऊ ऊर्फ नानासाहेब शेवाळकर यांचे प्रमुख उपस्थितीत १६ जुलै २००८ रोजी मोठया थाटात अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ झाला. आणि समारोप प. पू. श्री जितेन्द्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या संपूर्ण वर्षभरात श्री समर्थ विद्यालयाने विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या. त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन, समर्थ रोप वाटीकेचे उद्घाटन व विविध कार्यक्रम घेण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय कार्यक्रमात अमृतपर्व स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.
अमृत महोत्सवीय वर्षात करण्यात आलेल्या संकल्पांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आज देवरणकर नगर स्थित श्री समर्थ विद्यालयाच्या प्रवेश द्वारावर येताच आपल्या प्रथम दृष्टीपथास येतो तो श्री समर्थ रामदासांचा भव्य दीव्य पूतळा ज्यांच्या कृपाशिर्वादाचे छत्र सदोदीत सर्व विद्यार्थी शिक्षकच नव्हे तर वास्तुतील निर्जीव घटकांवर देखील आहे. शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येताच श्री समर्थ विद्यालयाचे प्रांगण, बास्केट बॉल मैदान, ज्यावर मुले सदोदीत रमताना दिसतील असे चित्र दिसते. त्यानंतर श्री समर्थ विद्यालयाची भव्य दुमजली इमारत इंग्रजी एल आकारामध्ये दिसते. इमारतीत प्रवेश करताच समोरच सुसज्ज कार्यालय, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक कक्ष, पर्यवेक्षक कक्ष चौकशी कक्ष आपल्याला दिसतो. कार्यालयाच्या बाजूलाच कोणालाही हेवा वाटावा असा आधुनिक सोयी असलेला शिक्षक कक्ष दिसतो. आज श्री समर्थ विद्यालयात एकूण २४ वर्गखोल्या, ३ सुसज्ज प्रयोगशाळा, भले मोठे ग्रंथालय आणि ५० संगणक असलेला फर्निचरयुक्त आधुनिक सोयींनी युक्त असा संगणक कक्ष, १००० विद्यार्थी बसु शकतील एवढे मोठे समर्थ सभागृह आणि सुंदर स्वयंपाक घर असलेले शालेय पोशण आहार चा परिसर आहे. सोलर पॅनल सिस्टीम, वॉटर कुलर, उत्तम पिण्याच्या पाण्याची सोय आहे. (ज्याचे पाणी संस्था पदाधिकार्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत निःशंक पितात) इमारतीच्या मागील बाजूस सदा बहरलेली रोपवाटीका असून संपूर्ण परिसरात आपल्याला हिरवळ दिसते.
कार्यालयाच्या दोन्ही बाजुला ब्लॅक बोर्डातील एकावर कायम स्वरूपी भारताच्या राजकीय नकाशा पेंट केला असून त्यात परीपाठाचे विद्यार्थी राज्य व राजधान्यांची नावे लिहीतात तर दुसरा ब्लॅकबोर्ड वााढदिवसांच्या शुभेच्छासाठी रंगविला असून त्यावर रोज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची नावे लिहूून समर्थ परीवारातर्फे शुभेच्छा दिल्या जातात. प्रत्येक वर्गखोल्यांमधून हिंंदी, इंग्रजी, मराठी आणि संस्कृतमधे सुविचार लिहीलेले आहेत. दररोज शाळेत परिपाठामधे एक संस्कार प्रार्थना होते. अशा एकूण ७ संस्कार प्रार्थना असून ७ दिवस त्या घेतल्या जातात. श्री समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. मंगरूळकर यांचे शालेय प्रशासन, त्यांची शाळा चालविण्याची पद्धती, त्यांची मेहनत यामुळे शाळेचा नावलौकिक आजही कायम आहे. आज सद्यस्थितीत शाळेत १७०० ते १८०० विद्यार्थी ५० पेक्षा अधिक शिक्षक-शिक्षिका ३० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. श्री समर्थ कृपेमुळेच श्री समर्थ माध्य. व उच्च् माध्य. विद्यालय प्रगतीपथावर आहे. यात शंकाच नाही.
| जय जय रघुवीर समर्थ |