अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा वर्षाचा नेत्रदीपक व भावस्पर्शी समारोप
दि. २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१६ दरम्यान अष्टदशकपूर्ती समारोप 'अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा २०१६' या सदराखाली संपन्न झाला. ६ दिवसांमध्ये विदयार्थी व पालकांसाठी तसेच माजी विद्यार्थ्यांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
२१ डिसेंबर, समारोप सोहळ्याचे व स्नेहसंमेलनाचे उदघाटन
२१ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता अमरावती शहराच्या महापौर मा. चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा वर्षाच्या सांगता समारोहाचे तसेच शालेय स्नेहसंमेलनाचे उदघाटन झाले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद कोलवाडकर होते. यावेळी पाहुण्याच्या हस्ते पुष्पप्रदर्शनीचे देखील उदघाटन करण्यात आले. विविध राष्ट्रीय, राज्य तथा विभागीय शालेय क्रीडा स्पर्धामध्ये निवड झालेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले. पुष्पप्रदर्शनी संकल्पना प्रयोगशाळा सहाय्यक श्री. सुरेश इंगोले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
राष्ट्र जागरणं संस्कृत गीत रामायण
२१ डिसेंबर रोजी सायंकाळी जेष्ठ कवी श्रीनिवास हिर्लेकर लिखित व डॉ ऋचा देव (नागपूर) निवेदित महाराष्ट्र जागरण संस्कृत गीत रामायण या संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. गायक कवीश्वर आणि कु मोनिका देशमुख यांनी आपल्या सुमधुर आवाजात गीत रामायणातील तथा स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली
२२ डिसेंबर , किटक स्लाईड शो
२२ डिसेंबर रोजी सकाळी पूर्व माध्यमिक विभागाचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला . सायंकाळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले गेलेले बुलढाणा येथील कीटकमित्र प्रा . अलोक शेवडे यांनी विद्यार्थ्यांना कीटकांच्या दुनियेची अनोखी सफर घडविली . शेवडे यांनी स्वतः फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी केलेल्या ४०० वर दुर्मिळ या अदभूत अशा छायाचित्रांच्या स्लाईड शो ने विद्यार्थ्यांच्या समोर किटक अनुपम सौंदर्याने नटलेले भावविश्व उलगडले गेले .
२३ डिसेंबर , भारत गणेशपुरेंचा मुक्त संवाद
२३ डिसेंबर रोजी सकाळी समर्थ विद्यालयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला .
२३ डिसेंबरला सायंकाळी सुप्रसिद्ध अभिनेते "चला हवा येऊ द्या " फेम भारत गणेशपुरे (अमरावतीकर) यांनी श्री समर्थ विद्यालयाचा विद्यार्थांनी मुक्त संवाद साधला . सिने व नाट्यसृष्टीत स्वतःला स्थापित करण्यासाठी करावा लागलेले संघर्ष व मेहनतीचे किस्से त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले . विध्यार्थी , पालक व शिक्षकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यांनी दिली . आपल्या लाडक्या भारतदांशी भेटून-बोलून विद्यार्थ्यांना आनंदाची अनोखी अनुभूती मिळाली व मेहनीतचे महत्व कळले .
२४ डिसेंबर ,स्मरणिका विमोचन व माजी विद्यार्थी मेळावा उदघाटन
२४ डिसेंबरला सकाळच्या सत्रात करवीर पिठाचे शंकराचार्य जगतगुरु प . पू . विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते दोन दिवसीय माजी विद्यार्थी मेळाव्याचे उदघाटन झाले. कार्यक्रमाला मा. मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या मातोश्री मा. श्रीमती सरिताताई फडणवीस (शाळेच्या माजी विद्यार्थिनी ) यांची विशेष उपस्थिती होती. शंकराचार्यांच्या हस्ते 'अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा २०१६' च्या स्मरणिकेचे व समर्थ विद्यालयाच्या फिलाटेनिक पोस्ट कव्हरचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. विनोद कोलवाडकर होते. यावेळी संस्थेचे सचिव मा. डॉ. देवदत्त बोधनकर यांच्या कार्याचा गौरव ताठ त्यांच्या बद्लची कृतज्ञता म्हणुन शंकराचाराचार्यांच्या हस्ते त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सचिवांचा सत्कार श्री. समर्थ विद्यालयाच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले.
माजी विद्यार्थी चर्चासत्र
२४ डिसेंबरला दुपारच्या सत्रात संस्था सचिव डॉ बोधनकर यांनी माजी विध्यार्थ्यांना संबोधित केले श्री समर्थ विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्थेने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांची संक्षिप्त माहिती देवून मा सचिवांनी शाळेच्या विकासाठी भविष्यात योजलेले संकल्प व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थेला असलेल्या अपेक्षा यांचा उहापोहा केला संस्थेला माजी विद्यार्थ्यांकडून केवळ आर्थिक मदतीचीच आवश्यकता नाही तर शाळेच्या विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन व सूचनांची देखील आवश्यकता आहे असे मा सचिवांनी उपस्थित माजी विध्यार्थ्यांना आवर्जून स्पष्ट केले मुख्यमंत्रांच्या मातोश्री श्रीमती सरिताताईसह अनेक माजी विद्यार्थांनी परिसंवादात भाग घेतला .
किशोरकुमार नाईट्स
सायंकाळी २४ डिसेंबरला नागपूर येथील व्यावसायिक कलाकारांनी 'किशोरकुमार नाईट्स ' हा बहारदार संगीत कार्यक्रम सादर केला. किशोरदांची रसिकांमध्ये लोकप्रिय असलेली अनेक धमाल गाणी यावेळी सादर करण्यात आली प्रशांत ठोंबरे , मनीष बोधनकर , दिपक चौधरी , अमित कांबळे या गायकांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले .
छंद प्रदर्शनीचे उद्दघाटन
२४ डिसेंबरला दुपारी छंद प्रदर्शनीचे उद्दघाटन झाले . शाळेचे उपमुख्याध्यापक श्री . दिलीप फाले यांच्यासह फिलाटेलिक संघटना अमरावतीचे पदाधिकारी आपल्या दुर्मिळ डाक तिकीट संग्रह तसेच नाणेसंग्रहासह सहभागी झाले होते ' सोन्याची डाक तिकिटे ' या छंदप्रदर्शनीचे खास आकर्षण ठरले .
२५ डिसेंबर , मिर्झा एक्सप्रेस
२५ डिसेंबर रविवार सुप्रसिद्ध कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या मिर्झा एक्सप्रेसने माजी विद्यार्थी मेळाव्यात रंगत आणली. आपल्या विनोदी विवेचन व कवितांमधून कधी राजकारणावर टिप्पणी करीत तर कधी मार्मिक कवितांमधून शेतकऱ्यांच्या व शोषितांच्या वेदना - व्यथांना सादर करीत मिर्झा यांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला . सौ. अलका तालहनकर व सौ. कांचन वीर या कवयित्रींनी डॉ. मिर्झा अहमद बेग यांना उत्कृष्ट साथ दिली.
माजी - विद्यार्थी मेळाव्याचा समारोप
२५ डिसेंबरला दुपारी माजी विद्यार्थ्यांच्या चर्चासत्रासह माजी विद्यार्थी मेळाव्याचा समारोप झाला. यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेच्या विकासासाठी शक्य असेल ती मदत कोणत्याही स्वरूपात करावी व आवश्यक तिथे मार्गदर्शन करावे असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विनोद कोलवाडकर यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना केले.
नादसमर्थचे सादरीकरण
श्री समथचे शिक्षक व शहरातील अग्रणी गायक श्री. मधुसूदन वटक यांच्या मार्गदर्शनात २५ डिसेंबरला सायंकाळी शाळेचे २३ आजी - माजी गायकांनी 'नादसमर्थ ' हा संगीताचा नादमय असा भावस्पर्शी कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांनी गायलेल्या एकापेक्षा एक अशा सुमधूर गाण्यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले व प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवली .
२६ डिसेंबर , या लाडक्या मुलांनो
२६ डिसेंबर रोजी सकाळी न्यू हायस्कूल बेलापूर या शाळेचे शारीरिक शिक्षक श्री. संदेश गिरी यांनी स्थापलेल्या त्यांच्या शाळेच्या २५ विद्यार्थी - विद्यार्थिनी बँड पथकाचे सादरीकरण झाले.
सकाळच्या सत्रात सौ. प्रज्ञा दर्भे बदलापूर यांच्या ' या लाडक्या मुलांनो 'या कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध कविता - कथांनी नटलेल्या त्यांच्या व्याख्यानाने उपस्थित पालक , शिक्षक व विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांचे व्याख्यान
सायंकाळच्या सत्रात सोलापूर येथील नामवंत वक्त्या. अॅड. सौ. अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या खास शैलीत अड. रामतीर्थकर यांनी महिला , मुली ,पुरुष तथा पालकांचे उद्बोधन केले. घराच्या उंबरठ्याची मर्यादा व प्रतिष्ठा जपा असा अर्थपूर्ण संदेश त्यांनी दिला. त्यांच्या भाषणाने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला होता तर प्रेक्षागृह तीर्थमय झाले होते.
२७ डिसेंबर, अष्टकदशकपूर्ती सांगता सोहळ्याचा समारोप
२७ डिसेंबर रोजी सकाळी देवनाथ पीठाधीश प. पू. जितेंद्रनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत अष्टकदशकपूर्ती आनंद सोहळ्याचा समारोप झाला. शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या जितेंद्रनाथ महाराजांनी शाळेतील आपल्या आठवणी सांगताना त्यांच्या शिकविणाऱ्या शिक्षकांचे स्मरण केले. मी अनेक शिक्षण संस्था बघितल्या पण समर्थ विद्यालयासारखे समर्थपीठ कुठेच आढळून आले नाही असे गौरोवोद्गार महाराजांनी काढले, ही समर्थ विद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली. अष्टकदशकपूर्ती आनंद सोहळा वर्षातील विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थी, शिक्षकांना प. पू. जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाआनंदमेळा
२७ डिसेंबर रोजी सायंकाळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भरगच्च असा आनंदमेळा 'महाआनंदमेळा' सिध्द झाला. सुमारे दीडशेवर स्टॉल्स् आनंदमेळाव्यात लागले होते व खरेदीदारांनीही तेवढीच गर्दी केली होती. दोन तासाच्या आत स्टॉल्स्धारकांचे सर्व जिन्नस संपून गेले. उत्कंठावर्धक अशा हौजी गेमने आनंद मेळाव्याची सांगता झाली.
आखीव नियोजन व रेखीव आयोजन
सातही दिवसाच्या कार्यक्रमांचे उत्कृष्ट व आखीवरेखीव असे आयोजन मा. डॉ. देवदत्त बोधनकर यांच्या मार्गदर्शनात मा. मुख्याध्यापिका सौ. माधवी मंगरूळकर यांनी केले होते. त्यांना उपमुख्याध्यापक मा. श्री . दिलीप फाले पर्यवेक्षिका सौ. आरती काळे व सौ. वीणा कारणकर यांचे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा ऱ्यांचे तथा विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. आयोजन समितीचे सदस्यांनीही उत्साहाने व जबाबदारीने प्रत्येक ठिकाणी सहकार्य केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद कोलवाडकर , उपाध्यक्ष प्रा. मोहन पुरोहित, सचिव डॉ. देवदत्त बोधनकर, सदस्य श्री. रमेशपंत डांगे यांनी प्रत्येक कार्यक्रमाला पूर्णवेळ आवर्जून हजेरी लावित आयोजनात वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी सर्व कार्यक्रम यशस्वी पार पडून अष्टकदशकपूर्ती आनंद सोहळा २०१६ नेत्रदीपक व भावस्पर्शी ठरला. मेळाव्याला आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची प्रगती पाहून अतीव समाधान व्यक्त केले.